Friday, 8 December 2017

दे जरा इकडे चष्मा तुझा

गुगल सारखं
तुझ्या मनावरचं पेज
चष्मा तुझा
शोधेल का गं जरा ?

दे जरा इकडे
चष्मा तुझा
पाहू दे त्यातून
काय दिसतंय का मला ?

रोजची तुझी धावपळ
घर आणि ऑफिस अशी पळापळ
दमछाक तुझी त्यातून
कळते का मला ?

गर्दीने तुंबलेली लोकल
तुझा दगदगीचा प्रवास
त्यात गुदमरलेला श्वास
तो श्वास समजेल का मला ?

अन दिवसाच्या शेवटी
घरची तीच कामं
थकवा ,कंटाळा आला तरी
जमेल का गं मला ?

कधी दुखावलं असेलं
भावूक मन तुझं
तेंव्हा त्या निघालेल्या अश्रूंना
त्या चष्म्यातून प्लीज अनुभवू दे मला

चांगलं की वाईट कशी ठरवते तू
समोरच्या व्यक्तीला
चष्म्यातून तुझ्या
तू पाहू देशील का मला ?

डोळ्यातला आनंदीपणा
तुझा खोडकर पणा
यार , दिसेल का
तुझ्या चष्म्यातून मला ?

डोळ्यात तुझ्या
प्रेमाची ती सावली
यार ,ओळखता येईल का
तुझ्या चष्म्यातून मला ?

तुझ्या मनावरचे स्टेट्स
नसेल प्रोब्लेम तुला तर
त्या चष्म्यातून
वाचू का मी जरा ?

कदाचित लपलेलं
तुझ्या नजरेतलं माझं स्टेट्स
त्या चष्म्यातून
पूर्ण आणि स्पष्ट दिसेल ना मला

दे जरा इकडे
चष्मा तुझा
पाहू दे तुझ्या नजरेतून
हे सगळं जग मला
                                           -----नितीन खंडारे


















2 comments:

Anonymous said...

Awesome. Very nice

Sunil said...

Good one