Thursday, 26 October 2017

एक रेल्वेवरचा पूल

रोजचा दिवस अन रोजचीच धावपळ
होती सुरू वर्दळ माझ्या अंगाखांद्यावर,

गप्पाटप्पा ऐकत होतो अशाच अवखळ
की कसा देश चालतोय एका तोंडाच्या वाफेवर,

GST,नोटबंदी अशा कडू औषधाचा प्रयोग कसा फसला,
केला कसा भ्रमनिरास त्याने ऐकू येत होत कानावर

ऐकलं होत कि कायदा चांगला पण अतिघाई,मनमानीने केला घोळ ,
म्हणून अर्थव्यवस्था घसरली ,परिणाम झाला नोकरी उद्योग धंद्यावर

सुरुवातीला मेक इन इंडिया ऐकून बर वाटल हो  थोडावेळ ,
पण त्यातही बाहेरच्याच कंपन्या, काय बोलू या गुंतवणुकीवर ?

आजही बघतोय, स्त्रियांच्या सुरक्षेत ठरतोय आपण कुचकामी भासतो दुर्बल
पण गाईंच्या रक्षणासाठी कुठून येतात हो हे गौरक्षक एवढ्या तत्पर ?

बुलेट प्रूफच जॅकेट सैनिकांना भेटो न भेटो याची कोणाला पर्वा ना आठवण
पण मोजक्या लोकांसाठी असलेल्या बुलेट ट्रेनच कौतुक होतं सर्वांच्या ओठावर

नवनवीन तंत्रज्ञान यावे यात कधीही नव्हत दुमत कोणाचही यावर
पण कोणासाठी,कशासाठी अन कोणत्या स्वार्थासाठी जीवघेण्या किमतीवर ?

मित्रो , फक्त आपल्या मनची बात बरोबर असच होत आलय सर्ववेळ
पण कधी घेतला का त्यांनी कानोसा सर्वसामन्यांच्या मनातील समस्यांवर

अशाच रोजच्या गोष्टी ऐकत होतो त्यादिवशी पण
मरमर के जीना है, सब चलता है येत होत हे कानावर

पण त्यादिवशी अचानक अफवेने ,बेशिस्तीने झाली गडबड
पूल कोसळला म्हणून माजला कल्लोळ , झाली गर्दी अनावर

सारे झाले सैरभैर , पळत इकडे तिकडे , उडाला एकच गोंधळ
जीव वाचवण्याच्या खेळात दबले गेले , रचले गेले माणसांचे थरावर थर

कुणी गुदमरून तर कोणी अडकून फसले तर काही जगण्याच्या प्रयत्नात झाले निष्फळ
पण मी काही करू शकत नव्हतो , बघत होतो फक्त सगळ परिस्थितीसमोर होऊन हतबल

नेहमी श्वास गुदमरून,चेंगरून,जीव मुठीत घेऊन प्रवास करणारे ,जगणारे ते
त्यादिवशी चेंगरून गुदमरून जीव गमावून निघून गेले अखेरच्या प्रवासावर 

तो प्रसंग आणि जीव गमावणाऱ्यांना आठवून आजही थरथरतोय हा पूल पायापासून
विचार केलाय का कधी,काय ओढवले असेल त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांवर ?

त्यादिवशी पूल कोसळला अशी पसरली होती अफवा एका क्षणात  केवळ
पण खरच कोसळलो मी मनाने,खचलो गेलो पाहून मी हा दुर्देवी प्रसंग घडल्यावर

त्यादिवशी मेलेल्यांच्या वरच लोणी खावून, माणुसकीला लाजवून गेले काहीजण
पण काहींनी जपली माणुसकी, देवून हात , करून मात त्या आलेल्या संकटावर

वाईट वाटलं ,या घटनेची पण झाली केवळ राजनीती,विसरून तो भयावह क्षण
फक्त घोषणा आणि आश्वासनच पदरी पडली हाती एवढी दुर्घटना घडून गेल्यावर

माझ म्हणण एकच,
स्वप्न नाहीत मोठी सर्व सामन्यांची , एकवेळ जाणून घ्या त्याचं मन
द्या त्यांना गरजेच्या सुविधा बनवा त्यांच जीवन प्रवास थोडफार सुखकर
काय बोलताय , घ्या ना  थोड हे मनावर ...........

पण सर्व विसरून पुन्हा दुसऱ्या दिवशी नव्याने झाली माझ्या अंगाखांद्यावर धावपळ
प्रश्न पडला मला, विसरून सगळे असे कसे चलता है म्हणत चाललाय हा मुंबईकर ?

अरे ऐक मुंबईकर,
एकदा तरी आवाज उठव या विरुद्ध स्वतःसाठी काढून थोडीशी सवड
दबलेली भावना , राग यांना कधीतरी वाट देवून मोकळी तर तू कर

किती दिवस , तडजोड करत ,चलता है म्हणत, मरमरून जगत तू राहणार
आता तरी सावर
स्वतःला नको पण या अन्यायाला ,भ्रष्टाचाराला,असंवेदनशील नेत्यांना
घालना कधीतरी आवर.....
                                                                                                                     
                                                                                                                    ---नितीन खंडारे

















No comments: