Wednesday, 18 October 2017

तुतारी--- केशव सुत

एक तुतारी द्या मज आणुनी
फुंकीन मी जी स्वप्राणाने
भेदूनि टाकीन सगळी गगणे
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मज आणुनी

अवकाशाच्या ओसाडीतले
पडसाद मुके जे आजवरी
होतील ते वाचाल सत्वरी
फुंक मारिता जिला जबरी
कोण तुतारी ती मज देईल ?

रूढी ,जुलूम यांची भेसूर
संताने राक्षसी तुम्हाला
फाडूनी खाती हि हतवेला
जल्शाची का? पुसा मनाला !
तुतारीने ह्या सावध व्हा तर !

चमत्कार ! ते पुराण  तेथुनि
सुंदर , सोज्वळ गोड मोठे
अलीकडे ते सगळे खोटे
म्हणती धरुनी ढेरी पोटे
धिक्कार अशा मूर्खां लागूनी

जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध ! ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवुनी

प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्यावरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा ?
विक्रम काही करा , चला तर !

धार धरलिया प्यार जीवावर
रडतील रडोत रांडापोरे
गतशतकांची पापे घोरे
क्षालायाला तुमची रुधिरे
पाहिजेत रे ! स्त्रैण न व्हा तर !

धर्माचे माजवुनी अवडंबर
नीतीला आणिती अडथळे
विसरुनिया जे जातात खुळे
नीतीचे पद जेथे न ढळे
धर्म होतसे तेथेच स्थिर

हल्ला करण्या तर दंभावर तर बंडावर
शूरांनो ! या त्वरा करा रे !
समतेचा ध्वज उंच धरा रे !
नीतीची द्वाही पसरा रे !
तुतारीच्या ह्या सुराबरोबर

नियमन मनुजासाठी , मानव
नसे नियमनासाठी , जाणा
प्रगतीस जर ते हाणी टोणा
झुगारूनी दे देऊनी बाणा
मिरवा निज ओजाचा अभिनव !

घातक भलत्या प्रतिबंधांवर
हल्ला नेण्या करा त्वरा रे !
उन्नतीचा ध्वज उंच धरा रे !
वीरांनो ! तर पुढे सरा रे
आवेशाने गर्जत हर हर !

पूर्वी पासूनी अजुनी सुरासुर
तुंबळ संग्रामाला करिती
संप्रती दानव फार माजती
देवावर झेंडा मिरविती !
देवांच्या मदतीस चला तर !

                                           ----- केशवसुत


                                          कवितेतल्या काही आवडलेल्या ओळी आणि त्यांचा अर्थ 
   
     "चमत्कार ते पुराण तेथुनि.............धिक्कार अशा मूर्खां लागूनी " अलीकडे  गोड बोलून , चमत्काराच्या बाता ठोकून  खोटे लोक आपली पोटं भरतायत आणि अशा मुर्खांच्या नादी लागणाऱ्या मूर्खांचाही त्यांनी इथे धिक्कार केला आहे. एवढं आपल्या विचारवंतांनी समजवूनही अजूनही आपण बाबांच्या मोठ्या कांड लीला ला बळी पडतोय. ही खूप मोठी आपल्या आजच्या समाजाची शोकांतिका आहे
     "धर्माचे माजवून अवडंबर.........."   धर्माचा वापर करून आपण नीती , न्याय आणि प्रगतीला अडथळे निर्माण करत आहोत. धर्माचा  लोकांना एकत्र आणण्यासाठी वापर  न करता लोकांना विभागण्यात , त्यांच्यात दरी निर्माण करण्यासाठी वापरत आहोत. आज आपण भोवताली हे अनुभवत आहोत.
" नियमन मनुजासाठी , मानव , नसे नियमासाठी जाणा..........." नियम माणसासाठी आहेत माणूस नियमासाठी नाही. नियम माणसासाठी त्याच्या सोयीसाठी असतात . पण कधी कधी नियमावर जास्त जोर देता देता  माणसांच्या गैरसोयीच कारण हि तेच नियम ठरतात.याच जिवंत उदाहरण सध्या आपण अनुभवत आहोत. नियम/कायदा  लवकर लागू करण्याच्या नादात लोकांची गैरसोय झाली . नुकसान झालं. चांगला नियम असूनही यतो लोकांपर्यंत पोहोचला नाही.
     "जुने जाऊ द्या मरणा लागूंनी , जाळुनी किंवा पुरुनी टाका" . पण  अजूनही आपण जुन्या अनिष्ट  रूढी परंपरा यांना चिकटून आहोत. त्यांचा  त्याग करून , यांना जाळून दूरदृष्टी ठेवून खांद्याला खांदा लावून ,बुद्धिप्रामाण्यवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांची कास धरून आपल्याला पुढे जायला हवे. असे मत कवीने व्यक्त केले आहे.
     शांत बसून मेद म्हणजे चरबी वाढवू नका. सतत न थकता काम करा. रोज कालच्या पेक्षा आज जोमाने काम करा. आणि आयुष्य सुंदर बनवा.  समता आणण्याचा आणि समाजात असलेल्या वाईट प्रवुत्तीवर मात करण्यासाठी एकत्र येऊन  त्याविरुद्ध लढण्याचं आव्हान येथे कवितेत कवीने केले आहे.
    अशाप्रकारे अंधश्रद्धा , जुन्या अनिष्ट प्रथेविरुद्ध , चालीरीती विरुद्ध लोकांना एकत्र आणण्यासाठी , समाजातील नीतिमत्ता जपण्यासाठी , कर्म प्रधान होऊन दूरदृष्टी ठेवून एक नवा समता प्रधान समाज निर्मितीसाठी एक रणशिंग , तुतारी कवीने कवितेद्वारे फुंकली आहे.  
     आजच्या परिस्थितीला हि कविता समर्पक  वाटते. अजूनही आपण आपल्या थोर विचारवंतांचे विचार आपल्यात, या समाजात रुजवण्यात कमी पडलो आहे हे ही प्रकर्षाने जाणवते. चला , तर मग या कवितेतील ऊर्जा घेऊन आपण आपल्या समाज सुधारकांना अपेक्षित असा समाज घडवूया.
.

No comments: