Monday, 27 November 2017

काय हवे आहे तुला ?

पाठ फिरवुनी पाठ दाखवणे
तुझे पाठ आहे मला
एकदा तरी सांग सखे
काय हवे आहे तुला ?

गोड आहे रुसवा फुगवा
तुझा पण सोड हा अबोला
नाकावरचा राग विसरून
एकदा बोल ना गं तू जरा

मन मोकळ कर तुझं सखे
बोलू दे तुझ्या या मनाला
कळतंय तुझं मन पण कळू दे
अजून काय गुन्हा मी केला ?

प्रेमाचा असेल तो गुन्हा तर
नकळतच आपल्यातचं घडला
पण प्रेमाची शिक्षा प्रेमच
सखे इलाज नाही त्याला

जेंव्हा हे बोललो तेंव्हा
सुंदर निरागस हसू आलं तुला
बस आयुष्यभर तुझ्या ओठावर
हेच हसू रहाव असचं वाटत  मला
                                                  ----नितीन खंडारे


Wednesday, 22 November 2017

सांग ना तू मला

प्रेम म्हणजे काय असतं ?
कळलं नाही अजूनही मला
कसं ,केंव्हा अन कुठेही होतं
असेल माहित तर हे सांग ना तू जरा

मिठीत घेवून व्यक्त करणं की
दूर राहून ही व्यक्त होणं
हे प्रेम कसं व्यक्त होतं ?
व्यक्त हो,अन सांग ना तू मला

रोज रोज भेटणं की
न भेटता ही एकमेकांना ओळखणं
हे प्रेम कसं ओळखायचं ?
ओळख अन सांग ना तू मला

तुझ्या सेल्फीतल्या फोटोला पाहतचं राहणं की
प्रत्यक्ष तू असताना ही न पाहुनी तुला पाहणं
ते प्रेमातलं  पाहणं कसं असतं ?
जरा वळूनी पाहून सांग ना तू मला

फोटो मधली मधाळ तू की
प्रत्याक्षातली हळवी , मनमिळावू तू
यातली नक्की आहेस तू कशी ?
मन मोकळेपणाने सांग ना तू मला

ग्रुप वर बोलणारी तू की
दोघात न बोलता खूप काही बोलून जाणारी तू
हे प्रेम कसं बोलतं  ?
एकदा बोलून सांग ना तू मला

WHATSAPP वर भेटणारी तू की
सहज नकळतचं वाटेवर भेटणारी तू
यातलं कोण खरं ?
भेटून सांग ना तू मला

माझ्या हाकेला कुठेही साद देणारी की
मी न बोलता, लिहिता ही मला समजणारी
ही प्रेमाची अजब गजब व्याख्या तू
समजून सांग ना तू मला

प्रेमाचं कोडं अजूनही गुंतत चाललय
उलगडलचं नाही मला
तू सोडवलं असेल हे कोडं
तर भेट अन खरंच सांग ना तू मला

                                                         ----नितीन खंडारे




Thursday, 16 November 2017

बाप माणूस - लेख

   बाप बाप असतो असं म्हणतात ते खरंच आहे.बाप समजायला जसा कठीण तसंच त्याच्यावर लिहिणं ही कठीण आहे. म्हणून की काय या बापावर लिहिलेलं सहसा फारसं आढळत नाही.
   आज हा विषय का? तर काही दिवसांपूर्वीच एका बापाला भेटलो. बापाला? अहो, माझ्या नाही. मी ज्याच्या विषयी बोलतो आहे तो बाप माणूसच आहे आपल्या क्षेत्रातला. पण त्या बरोबरच एका नऊ वर्षाच्या मुलाचाही. सर म्हणतो मी त्यांना आणि तेही सर म्हणतात मला. कळलं नाही ना का ते? पण जेव्हापण मी त्यांना भेटतो तेंव्हा त्यांचा एकच प्रश्न असतो.... हसताय ना! अहो तो नव्हे जो महाराष्ट्राला पडलाय. तर "काय सर, कसे आहात?" हा प्रश्न. एकदा राहवलं नाही म्हणून मी त्यांना म्हटलं " सर, सर म्हणू नका . नितीन म्हणा." तेंव्हा ते म्हणाले," नितीन... ओह नितीन...सर." तेंव्हा ही ते सरच म्हणाले. कदाचित आपण लोकांची नावं विसारतो हे लोकांना कळू नये म्हणून की काय ते प्रत्येकाला सर म्हणत असावे बहुधा.
   तर अशा या बाप माणसाला त्यांच्या मुलासोबत भेटलो तेंव्हा नेहमीचा बाप-बेटा वाला अनुभव भेटला नाही. तर एक मित्र असलेला, मार्गदर्शक अन टीकाकार असलेला बाप पाहायला मिळाला. आपल्या मुलाला सांभाळून नाहीतर त्याला स्वतःलाच सांभाळायचं कसं हे सांगणारा बाप मी पहिल्यांदा बघितला. मी नाही तर तुझा गुंता तुलाच सोडवायचा आहे असं सांगणारा तो आणि वेळ प्रसंगी पाठीशी उभा राहणारा ही तोच. असा बाप पाहायला भेटला.
   "सर, बागबानच्या अमिताभ सारखं झालं तर..." अस मी सहजच विचारलं. तर सर मिश्किल हसत म्हणाले," त्याच्या सारखं... अगोदरच त्याला सांगितल बायको आली आणि पटलं नाही तर सरळ बाहेर व्हायचं. घर माझं आहे आणि त्यातलं तुला काही देत बसणार नाही. त्याला स्वतः च्या पायावर उभं करतोय अजून काय हवंय त्याला... काय रे बच्चा ..." असं दिलखुलास ते मुलासमोर बोलत होते. स्पष्ट बोलणारा,मित्र असणारा, मुलाच्या प्रत्येक फुटबॉल मॅचला हजर असणारा ह्या बापाचं आपल्या मुलाला मोठं कसं करायचं या गोल वर लक्ष ठाम होतं हे त्यावेळी मला दिसून आलं.
   अशीच चर्चा आमची सुरू असताना सरांच्या भाषेत , आमचे दुसरे सर ऑफिस मधून बाहेर आलेत. माझा चांगला मित्र आणि संगीतकार आणि एक बाप माणूस. कलेतला आणि दोन मुलींचा ही. अभिनय,नृत्य , संगीत या कलेबरोबरच इतर बरेच से ज्ञान अवगत असलेला... अजून कोणते ज्ञान ? भेटालं ना तर नक्की साक्षात्कार होईल त्या ज्ञानाचा आणि आपल्या ज्ञानाचा काही ही उपयोग नाही हेही सिद्ध होईल त्याच्या समोर अस वाटेल पण तसं काही नाही. पण खरंच कलेचं आणि जीवनाचं ज्ञान अन भान असलेला तो, एक बाप माणूस. आदर्श शिंदे बरोबर गाणी केलेला एक आदर्श असा नवरा आणि बापही. (टीप: आदर्श शिंदे आणि याचा फक्त गाण्यापुरता संबंध आहे. कृपया याचा चुकीचा अर्थ काढू नये.) तर असा हा आदर्श असा बाप. मुलींचे लाड करण्यापासून ते त्यांना वाईट सवयी पासून दूर ठेवणारा आणि तेव्हढाच त्यांच्या आईने रागावून ही नकळतच तिच्या, मुलींचे हट्ट पुरवणारा हा बाप. अनेक वेळा कामानिमित्त बाहेर असणारा , व्यस्त असूनही वेळ काढून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणारा, हा बाप माणूस. कुटुंबाचा ताल , सूर बिघडत असेल तर ताला सुरावर आणणारा बाप असं याच वर्णन करता येईल. खरंच इतकं तो सहज सोपं कसं करतो हे कळतच नाही.
   अशा या माझ्या आयुष्यातल्या बाप माणसांना मी जवळून अनुभवलंय. तसं माझ्या बापालाही. मी जन्मल्या पासून. काही अडचणींमुळे माझ्या आयुष्यातला सूर हलला होता आणि जीवनातला गोलही दूर होत चालला होता. पण आज मला सावरता येतंय. एक नवीन आयुष्य जगता येतंय. आज जो काही ही मी आहे आणि भविष्यात जे काही नाव कमावणार आहे त्यात त्यांचं श्रेय आहे , त्यांचाच मोलाचा वाटा आहे हे कायम स्वरूपी माझ्या मनात असेल.
                                                                                ----- नितीन खंडारे.

Tuesday, 14 November 2017

शोधतोय मी बालपण

शोधतोय मी बालपण
इकडे का तिकडे
कुठे हरवले ते लहानपण

लहानपणी हट्टाने
आईबाबांकडे मागत होतो
"हे नको, हे हवे, ते पण "

मोठे झालो अन
गुरफटून बसलोय आता
गमावून बसलोय ते क्षण

लहान होतो तेंव्हा
हव होत आपल्यातल मोठेपण
आता मोठेपणात विसरलोय ते आपलेपण

मित्र होते जिवलग भरपूर
पण मोठे झालो अन
हरवून बसलोय ते मित्रपण

न होता ताण जीवनात
न होता कोणता भारपण
होता जगण्यात तेंव्हा एक मोकळेपण

पक्षांसारखे मोकळ्या हवेत
नव्हती मोठी झेप पण उडत होतो सर्वजण
झेप घेण्याच्या नादात गमवाल ते आकाशपण

आता फक्त धावपळ
न राहिला आता कोणता
आपल्यांसाठी थोडासा वेळपण

ध्येय बदललंय आयुष्यातलं
तन मन जरी ठरलंय अडचण
तरी लक्ष्य आहे फक्तच धन

शोधतोय ते बालपण
सगळीकडे शोधलंय
पण सापडत नाही ते कुठेपण

पण जेंव्हा हात ठेवाल हृदयावर
तेंव्हा कळेल तुम्हालापण
दिल तो बच्चा है जी आजपण

खुलून जगा ,ठेवून मोकळे हे मन
बघा तिकडेच सापडेल तुम्हाला
तुमचं हक्काचं बालपण
                                             ----नितीन खंडारे






Tuesday, 7 November 2017

व्यसनमुक्त अभियान

विना जाहिरातीची
असे कसे विकले जातात धुम्रपान अन मद्यपान
बडी मिजाज यांची
असतात या भावांचे नेहमीच चढे भाव अन ताठ मान
घेणाऱ्याला पर्वा नाही यांच्या दराची
महागाईची ना  कटकट वाटत अन ना कसला ताण
कश मारताना सिगारेटची
फुस्फुसाचा श्वास घोटला तरी वाटते याची शान
मजा वाटते या धुराची
पण या धुरात हरवतो आपण आपल्या आरोग्याच भान
क्रेझ ऐकली असेल 20-20 ची
पण काहींचा 30,60 अन 90 च्या खेळात असतो जीव की प्राण
मग चालताना होते तारांबळ त्यांची
होतो सूर्याभोवती पृथ्वी फिरते असा साक्षात्कार त्या घोटात छान
आरोग्याला हानिकारकाची
चेतावणी असूनही आपले त्यावरच असते ध्यान
मित्र हो तब्येत नाही तुमची
आहे पूर्ण कुटुंबाची म्हणून छेडा तुमच्या पासून व्यसनमुक्त अभियान
                          
                                                                 ---नितीन खंडारे